इंदिरा गांधी यांच्याबद्दल कोणत्याही शिवसैनिकाकडून अपशब्द येणार नाहीत – आदित्य ठाकरे

0
517

मुंबई,दि.१७(पीसीबी) – छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केली होती. तर इंदिरा गांधी आणि डॉन करीम लाला यांच्या तत्कालीन भेटीसंदर्भात त्यांनी या मुलाखतीत वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला आहे.राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

“यापुढे कोणत्याही शिवसैनिकाकडून इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द येणार नाहीत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल मोठा आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.राऊत यांनी केलेले विधान हे वेगळ्या संदर्भात होते, त्यांचे ते निरिक्षण होते. त्यामुळे प्रत्येक विधान हे त्या संदर्भातून बघणे गरजेचे आहे. या मुद्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता निवडणुका होऊन गेल्या आहेत; त्यामुळे राजकीय न बोलता कामाबद्दल बोलावे.

दरम्यान, ठाकरे सरकारने कुठल्याही कामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त या आधीच्या ज्या प्रकल्पांमध्ये आपण पैसा चांगल्या पद्धतीने वापरु शकतो, त्याबाबत रिव्ह्यू केला जात आहे. आज झालेल्या बैठकीत सर्व अधिकार्‍यांना हेच सांगण्यात आल आहे की, जनतेचा पैसा चांगल्या कामांसाठी वापरला जाईल याची काळजी घ्या. सगळे चांगले प्रकल्प आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.