आयपीएल’ चे काय होणार ?

0
240

नवी दिल्ली , दि. ५ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२०च्या १३व्या हंगामासाठी अतिशय उत्सुक आहेत. परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जाहिरातदारांचे पुरेसे आर्थिक पाठबळ मिळणार नसल्यामुळे ‘आयपीएल’ होणे जवळपास अशक्य आहे, असा इशारा स्टार अ‍ॅण्ड डिस्ने इंडियाचे अध्यक्ष उदय शंकर यांनी दिला आहे.

‘‘येत्या सहा ते आठ आठवडय़ांमध्ये आर्थिक बाजारपेठ सावरली, तरच हजारो कोटी रुपयांच्या जाहिरातींच्या बळावर ‘आयपीएल’ होऊ शकेल. कारण ‘आयपीएल’चे अर्थकारण त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. परंतु सध्या जगभरातील आर्थिक स्थिती कोलमडली आहे,’’ असे विश्लेषण शंकर यांनी केले.

स्टार इंडियाने २०१७मध्ये ‘आयपीएल’चे जागतिक प्रक्षेपण अधिकार पाच वर्षांच्या मुदतीसाठी मिळवताना विक्रमी १६ हजार ३४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. स्टार इंडियाने ‘बीसीसीआय’ हा करार करताना पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी २,००० ते २,२०० कोटी रुपयांपर्यंत जाहिरातून महसूल मिळवला. चालू वर्षांतील ‘आयपीएल’द्वारे स्टार इंडियाचे तीन हजार कोटी रुपयांचे जाहिरातीद्वारे लक्ष्य होते.

‘‘आयपीएल ही सर्वात महागडी स्पर्धा आहे. याचे प्रक्षेपण अधिकार मिळवण्यासाठीसुद्धा आम्हाला मोठी रक्कम मोजावी लागली. अन्य भागधारक आणि जाहिरातदार हे सध्याच्या आर्थिक चणचणीच्या परिस्थितीत ‘आयपीएल’ला पाठबळ देऊ शकणार नाही,’’ असे मत शंकर यांनी व्यक्त केले. सद्य:स्थितीचा आढावा घेऊन काही मोठय़ा जाहिरातदारांनी आधीच माघार घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

‘‘आयपीएल कधी होईल, हे स्टारच्या वतीने सांगणे कठीण आहे. आम्ही प्रक्षेपणकर्ते असल्याने ‘बीसीसीआय’शी बांधिल आहोत. सध्या तरी पावसाळी वातावरणात आणि करोनाच्या साथीमुळे स्पर्धा होणे कठीण आहे. परंतु परिस्थिती सुधारल्यास सुरक्षित वातावरणात योग्य ठिकाणी स्पर्धा झाल्यास उत्तम ठरेल, ’’ असा आशावाद शंकर यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात अमूल कंपनीचे व्यावस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले की, ‘‘सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत ‘आयपीएल’च्या जाहिरात उत्पन्नाला ५० टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. कमी खर्चात अधिक प्रसिद्धी मिळावी, ही सध्या जाहिरातदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘आयपीएल’च्या उलाढालीवर गंभीर परिणाम होऊ शकेल.’’