तब्बल ९०० कोटींचा चीन बरोबरचा करार या कंपनीनेही केला रद्द

0
261

लडाख, दि. ५ (पीसीबी) – पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सरकारसह सर्वच भारतीयांनी चीनची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबतचा भविष्यातील ९०० कोटींचा करार रद्द केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पण हिरो सायकल अशा बिकट परिस्थितीतही सुसाट धावत आहे. अलिकडेच हिरो सायकल कंपनीने कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला १०० कोटी रुपयांची मदत दिली होती. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे हिरो सायकल कंपनीनं चीनवर बहिषाकर टाकत करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल ९०० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार होता.

भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे.

हिरो सायकलने चीनसोबतचा आपला सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असून कंपनीनं जर्मनीत नवीन प्लांट सुरू करण्याची तयारी केल्याची बोललं जातं आहे. लॉकडाउनमध्येही हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यानुसार कंपनीनं आपली क्षमता वाढवली अशून उत्पादनात वाढ केली आहे.

दरम्यान, लॉकडाउनमध्ये अनेक छोट्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. अशातच सायकलचे सुट्टे भाग तयार करणाऱ्या छोट्या कंपनीना हिरो कंपनीत समाविष्ट होण्याची ऑफर देण्यात येत आहे. यातून हिरो कंपनीने स्वदेशी कंपन्यांना चालना देण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.