कोरोना बाधितांमध्ये रथीमहारथी – कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना कोरोनाची बाधा

0
370

पुणे, दि. ५ (पीसीबी) : राज्यात कोरोनीची बाधा झालेल्यांच्या यादीत रथीमहारथींची नावे आहेत. गृहनिर्माम मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना होऊन आता सुखरूप बाहेर पडले आहेत. आता पुणे शहराचे महापौर मुरली मोहोळ, विविध पक्षांचे पाच-सहा आमदार आणि असंख्य आजी-माजी नगरसेवक बाधित झाले आहेत. पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले. सार्वजनिक कार्यकर्त्यांचा लोकांशी सतत संपर्क येत असल्याने त्यांना बाधा होण्याचे प्रमाण वाढत असून तोच आता चिंतेचा विषय झाला आहे.

कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यमान आमदाराचा मुलगा, सून, नातवासह नोकराला कोरोना संसर्ग झाला. आमदाराच्या घरातच चौघे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चौघांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. इचलकरंजी शहरात काल दिवसभरात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा 4 वर गेला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील 25 टक्के भाग हा कंटेन्मेंट झोन झाला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी शहरवासियांना ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. शहरामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांनी प्रशासनाची वाट न पाहता आपल्या शहरासाठी आपणहून लॉकडाऊन पाळले पाहिजे. शहरवासियांनी आपले व्यवहार आपणहून बंद ठेवावेत, असे आवाहन धैर्यशील माने यांनी केले.

पुण्याचे महापौर कोरोनाच्या विळख्यात
दुसरीकडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र,शुक्रवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र उर्वरित चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील चार नगरसेवक कोरोना बाधित आहेत. दोन माजी नगरसेवकसुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही बाधा झाली आहे. शुक्रवारी पहाटे राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधीपक्ष नेते दत्ता साने यांचे कोरोना मुळे निधन झाले. त्यातून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे धाबे दणानले.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण
राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आले, पण रविवारी सकाळी आमदार लांडगे आणि त्यांच्या कुटुंबाला घरी सोडण्यात आले. आता ते घरीच उपचार घेत आहेत. मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली. गीता जैन यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी दरम्यान त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.