आयटी कर्मचाऱख्यांसाठी गुड न्यूज… वर्क फ्रॉम होम साठी आयटी ची मोठी सवलत मिळणार?

0
215

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : कोरोना लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम (घरातून काम) हा नवीन पायंडा रुजला आणि तो कायमचाच लागू झाला आहे. आयटी कंपन्यांना या पध्दतीचा अनेक अर्थांनी त्याचा मोठा आर्थिक फायदा झाला. आता हाच पॅटर्न कायम ठेवावा आणि त्याबदल्यात केंद्र सरकरानेच आयटी कर्मचाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत द्यावी, अशी शिफारस नॅसकॉम ने केली होती. त्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पात मोठी सवलत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

जनतेला येणाऱ्या बजेटमधून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांनुसार सामान्यत: आयकर आणि स्वस्त वस्तूंमध्ये सवलतीच्या स्वरूपात सूट मिळण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी घरातून काम करण्याची देशात नवीन पद्धतच तयार झालीय. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना अर्थसंकल्पात कर सवलत अपेक्षित आहे.
कोरोना साथीच्या काळात देशात टाळेबंदी होती. अशा परिस्थितीत लाखो कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्यास सांगितले गेले होते. खरं तर हे सर्व एवढ्या घाईघाईत झाले की, त्यासाठी नियमही तयार होऊ शकले नाहीत. आता कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी वीज, वातानुकूलित यंत्रे, पॉवर बॅकअप सिस्टीम यांसारख्या यंत्रणांवर खर्च करावा लागतोय. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पात काही तरतुदी अपेक्षित आहेत, जेणेकरून घरातून काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

घरातून काम करण्याची संस्कृती देशात आता सामान्य झालीय. नवीन कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. असा विश्वास आहे की, अशी बरीच कामे आता घरातून होऊ शकतात. आता ती एक नवीन सामान्य पद्धत रूढ झालीय. देशातील तंत्रज्ञान कंपन्यांसह बर्‍याच कंपन्यांनी ही संस्कृती वेगाने स्वीकारलीय. अशा परिस्थितीत 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात घरातून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्राप्तिकरात थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकार घरातून काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना करात सूट देऊ शकते.

घरून काम केल्याने कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला आहे. यासाठी आपल्याला हाय स्पीड इंटरनेट, पॉवर बॅकअप, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज, एअर कंडिशनर यांसारख्या गोष्टींवर जास्त खर्च करावा लागतो. बर्‍याच कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांचा खर्च दिलेला नाही. यामुळे कर्मचार्‍यांना हा खर्च स्वत: च्या खिशातून करावा लागतोय.

तज्ज्ञांच्या मते, सरकारने आगामी बजेटमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचार्‍यांना कर कपातीचा लाभ देण्याचा विचार केला पाहिजे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारामध्ये वाढ होईल, असा त्यांना विश्वास आहे. यामुळे देशातील उत्पादनांची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. घरून काम करताना जे काही कर्मचारी खर्च करीत आहेत, ते ऑफिसमध्ये काम करताना तो खर्च कंपनीकडून केला जातो. अशा परिस्थितीत तो खर्च करपात्र उत्पन्नातून वजा केला पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांचा कर वाचेल आणि त्यांच्या हातात अधिक पगार येईल.