आम्ही आमच्या कुटुंबाचं बघू, तुम्ही पत्नीला का सोडलं विचारलं का? – अजित पवार

0
616

पुणे, दि. १८ (पीसीबी) – लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेत पवार कुटुंबावर सातत्याने टिका करत आहेत. यावर अजितदादा पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही आमच्या कुटुंबांच बघू. आम्ही तुमच्या कुटुंबाबाबत विचारलं का?, तुम्ही पत्नीला का सोडले हे आम्ही विचारले का?, अशा शब्दांत अजितदादांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आतापर्यंत चार ते पाच सभा झाल्या आहेत. त्या प्रत्येक सभांमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर हल्ला केला आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काकाला कसे डोईजड झाले आहेत, हेही ते सातत्याने सांगत आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी पराभवाच्या भितीने माढा मतदारसंघातून माघार घेतल्याची टिकाही पंतप्रधानांनी केली आहे.

मोदी यांच्या या टिकेवर अजितदादा पवार यांनी पुण्यातल्या सभेत पलटवार केला आहे. आम्ही आमच्या कुटुंबाचं बघू. आम्ही तुमच्या कुटुंबाबाबत विचारलं का? तुम्ही पत्नीला का सोडलं, आम्ही विचारलं का? असं म्हणत अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

पवारांचा विषय काढल्याशिवाय मोदींचे भाषण पूर्ण होत नाही. पवार कुटुंब हा देशाचा प्रश्न नाही, असं ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, असं मोदी म्हणतात. मात्र त्यांच्याच धोरणांमुळे आज ऊसाला चांगला दर मिळत आहे, असंही पवार म्हणाले.