शिरूरमध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांची सीट धोक्यात; शिवसैनिक मनापासून प्रचारात सक्रिय नाहीत

0
1551

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत आहेत. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ येईल, तसतसे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय वारेही बदलू लागले आहेत. शिवसेनेसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानल्या गेलेल्या शिरूरमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची सीट धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. आढळराव पाटलांच्या प्रचारात शिवसैनिकही फारसे सक्रिय नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील १२ गावांनी पाण्याच्या मुद्द्यावरून मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याने आढळराव पाटलांचे चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.   

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ कोणता?, असा प्रश्न विचारल्यास साहजिकच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख होतो. या मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तसेच यापूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकदा लोकप्रतिनिधीत्व केले आहे. कधी काळी शरद पवार आणि पवार कुटुंबातील कोणीही शिरूर मतदारसंघातून उभे राहून निवडून यावे, असे उघड आव्हान आढळराव पाटील द्यायचे. त्यामुळे शिरूर मतदारसंघातून आढळराव पाटील हे चौथ्यांदा सहज खासदार होतील, असा सर्वांना विश्वास वाटायचा.

परंतु, मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसतसे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वारे बदलताना दिसत आहेत. आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. डॉ. कोल्हे हे आढळराव पाटलांना आव्हान देऊ शकणार नाहीत, असे राजकीय निरीक्षकांना वाटत होते. प्रत्यक्षात कोल्हे यांनी आढळराव पाटलांसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. गेल्या १५ वर्षांपासून नाराज असलेले शिवसैनिकही आढळराव पाटलांच्या प्रचारात फारसे सक्रिय नसल्याचे बोलले जात आहे. शिवसैनिकांनी प्रचारात मनापासून सक्रिय व्हावे यासाठी शिवसेनेकडून वारंवार बैठका घेतल्या जात असल्याचे समजते.

भाजपशी संबंधित असलेल्या एका संघटनेने शिरूर मतदारसंघातील प्रचाराचा अहवाल तयार केल्याचे बोलले जाते. हा अहवाल मातोश्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार शिरूर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये प्रचारात मरगळ असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचार करणारे अनेकजण आतून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी काम करत असल्याचेही दिसून येत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराच्या भावाकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू असल्याचा मुद्दाही गाजत आहे.

त्यातच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील १२ गावांनी पाण्याच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना निवडणुकीत पाणी पाजण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही १२ गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे लोकसभा, विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेला एकही नेता या गावांकडे फिरकत नाही. त्यामुळे या गावांनी पाणी नाही, तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे. त्याचाही शिवसेनेच्या आढळराव पाटलांना फटका बसणार आहे. एकंदरित शिरूर मतदारसंघात शिवसेनेचा हमखास विजय हा सोपा नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगल्यास आश्चर्य वाटायला नको.