‘अजित पवारांमध्ये आमदार फोडण्याची ताकद नाही’

0
202

शिर्डी, दि.१९ (पीसीबी) : भाजपचे आमदार फोडण्याएवढी ताकद अजित पवार यांच्यात नाही. ती असती तर ८० तासांचे सरकार त्यांना टिकवता आले असते, असे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

बुधवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर झालेल्या पत्रकारांशी ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराला १ लाख २० हजार मते मिळाली. याचा अर्थ तीनही राजकीय पक्षांना प्रत्येकी ४० हजार मते मिळाली. भाजपला एकटय़ाला ७३ हजार मते मिळाली. मात्र निवडणुकीत हे गणित चालत नाही, असे ते म्हणाले. टीका करत पाटील पुढे म्हणाले कि, ‘तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच होणार. ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडी विजयाचा प्रयत्न करील, मात्र आम्हीसुद्धा ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान आहे. पण सत्तेत असलेल्या शिवसेनेचेही नुकसान होत असून शिवसेना संपत चाललीय.’

पुढे राजकारणामध्ये जे नेते एकमेकांना ट्रोल करतात यावरसुद्धा पाटलांनी आपलं मत मांडत म्हणाले कि, ‘राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते एकमेकांना ट्रोल करताना मर्यादा पाळत नाहीत. मला ‘चंपा’ म्हटले गेले. मात्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘उठा’ किंवा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना ‘शपा’ असे कधी म्हणणार नाही. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,’