आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

0
243

बेंगळूरु, दि. ३ (पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे.

येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करुन मला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे, अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा यांनी लॉकडाउनसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. ‘काहीही झाले तरी, आता पुन्हा लॉकडाउन करणार नाही’ असा निर्धार येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. “कोरोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व प्रकल्प पूर्ण करेन” असे येडियुरप्पा म्हणाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा अशा बड्या आसामींनाच आता कोरोनाने घेरले आहे. महाराष्ट्रात आजवर ५ मंत्री, ३ खासदार, १२ आमदार असे कोरोना पॉझिटिव्ह आले आणि पूर्णतः बरे झाले आहेत. देशातील कोरोनाचा आकडा १७ लाख ५० हजारावर तर मृतांची संख्या ३७ हजार ३६४ पर्यंत गेली आहे. सुदैवाने कोरोनामधून बरे झालेल्यांची संख्याही ११ लाख ४५ हजार असल्याने आता भिती संपली आहे, मात्र कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने तो सरकारच्या चिंतेचा विषय झाला आहे.