आतापर्यंत शेकडो बैठका, पण आरक्षण काही दिले नाही – शरद पवार

0
458

बीड, दि. २ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये मेळावा घेऊन पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आतापर्यंत शेकडो बैठका झाल्या. मात्र, आरक्षण काही मिळालेले नाही. मराठा समाजालाही आरक्षण देणारच म्हणतात, पण केव्हा देणार ते  सांगत नाहीत. त्यामुळे हे लबाड सरकार घालविल्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की,  कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. उद्योगपती आणि धनदांडग्यांनी बँकांचे बुडविलेले ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पाझर फुटला आहे. मात्र, शेतकरी आत्महत्यांकडे बघायला सरकारला वेळ नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शंभर टक्के कर्जमाफी देणे गरजेचे आहे.

सत्तेवर येण्याआधी  भाववाढ होणार नाही, असे सांगणारे आता गप्प आहेत. सत्ता ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आवश्यक आहे. मात्र, देशात मोदी आणि राज्यातील फडणवीस यांच्या सत्तेमुळे समाजातील सर्व घटक  नैराश्यात आहेत.  त्यामुळे सत्ता परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही,  असे शरद पवार म्हणाले.