‘… आणि पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्ष आणि लिपिक लाच घेताना रंगेहाथ सापडले’

0
279

पुणे, दि.१४ (पीसीबी) : सेवा निवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्याक्षासह लिपीक आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे अध्यक्ष मंगल शिवाजीराव भुजबळ (वय -63), लिपीक संदिप रंगनाथ गायकवाड (वय-40) खासगी इसम शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ (वय-62) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिल तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरुन त्यांना नोकरीवरुन कमी न करण्यासाठी आणि भविष्यात सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 2 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.13) पडताळणी केली असता आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 2 लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना शनिवार (दि.16) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.