लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमच्या ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
216

– अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमला मोठे खिंडार पडले आहे. एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पाचही विद्यमान नगरसेवकांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जात आहे.लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते. एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.

अल्पसंख्याक समाजातील मान्यवर नेते व कार्यकर्ते मधल्याकाळात भावनेच्या भरात एमआयएममध्ये गेले होते. त्या सर्वांच्या लक्षात आले की, एमआयएमचा दुरुपयोग भाजप सत्तेत टिकण्यासाठी करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्याक समाजाची मते डिव्हाईड करुन भाजपचा विजय होण्यासाठी मदत होते आहे, हे लक्षात आले आहे. ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते, अनेक शहरात, जिल्हयात राष्ट्रवादीत येत आहेत. ही ताकद वाढत असताना अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल, असे सांगतानाच आपल्या हितसंबंधांना बाधा पोचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्ला केला. या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने नव्हे तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो, असं पाटील म्हणाले. दरम्यान, यापूर्वी जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर भाष्य केलं होतं. भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते. यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात 85 जागांपैकी जवळपास 48 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 19 जागा जिंकल्या आहेत. या निकालात महाविकास आघाडीने विकास कामातून जनता सोबत असल्याचे सिध्द केले आहे, असंही त्यांनी सांगितलं.