शरद पवार यांचा दोन दिवसांचा पिंपरी चिंचवड दौरा

0
360

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. महापालिकेतील भाजपाची सत्ता पुन्हा खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादीने आता सर्व ताकद पणाला लावली असून दस्तुरखुद्द मोठे साहेब रिंगणात उतरल्याने भाजपा गोटातही घबराट आहे. शनिवारी (दि.१६) राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक होणार असून रविवारी (दि.१७) मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. गटतट विसरून सर्व राष्ट्रवादी एक झाल्याने पक्षात नवचैतन्य आले असून इच्छुक उमेदवारांची रेलचेल आताच सुरू झाली आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक, तर रविवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

कसा आहे पवारांचा दौरा?
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस शहराचा दौरा करतील. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.