आगामी लोकसभा निवडणुकीत काय करायचे ते आम्ही ठरवणार; शिवसेनेचा भाजपला इशारा

0
1028

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय करायचे ते आम्ही ठरवू, अशा  शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला  इशारा दिला आहे. त्यामुळे युती करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला शिवसेनेच्या आणखी नाकदुऱ्या काढाव्या लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.   

कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शनिवारी (दि. १५) शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे  यांनी माने यांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यानंतर ठाकरे बोलत होते.  छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानची जनता सुज्ञ असल्याने  त्यांनी  कोणत्याही दहशतीला आणि लोभाला बळी न पडता मतदान केले. त्यांना हवे ते त्यांनी केले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,  कोल्हापूरातील शिवसेने नेते संजय मंडलिक  आदी  उपस्थित होते.  काही दिवसापूर्वीच माने यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व  खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे करणार का ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.