शिवसेना-भाजप एकत्र आल्यास, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल – मुख्यमंत्री

0
1063

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा  निवडणुकीत मतांचे विभाजन  टाळण्यासाठी  भाजप-शिवसेना यांची युती होण्याची गरज आहे. जर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आगामी निवडणुकीसाठी  शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही  आग्रही आहोत. ही युती होण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे फडणवीस म्हणाले.  ते एका वृत्तवाहिनीच्या  कार्यक्रमात बोलत होते.

राजकारणात आम्ही वेगवेगळे जरी असलो, तरी आम्ही भाऊ-भाऊ आहोत. मोठा कोण आणि छोटा कोण? हे माध्यमांनी ठरवावे, असेही फडणवीस म्हणाले. आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. युतीसाठी आम्ही स्वत: पुढाकार घेऊ, असेही  फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय करायचे ते आम्ही ठरवू, अशा  शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला  इशारा दिला आहे.