चिखलीत साईड न दिल्याच्या कारणावरुन बसचालकाने दाम्पत्याला केली मारहाण

0
919

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – दुचाकीवरुन चाललेल्या एका दाम्पत्याने स्कुल बसचालकाला साईड दिली नाही म्हणून बसचालकाने या दाम्पत्याला भररस्त्यात शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.१५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

याप्रकरणी पीडित २१ वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्कुल बसचालक मधुकर रत्नाकर ढोले (रा. नेवाळे वस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी २१ वर्षीय महिला या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवर चालल्या होत्या. यावेळी मागून आलेला आरोपी स्कुल बसचालक याने त्यांना वारंवार हॉर्न दिला. पण रस्ता खराब असल्याने फिर्यादी यांच्या पतीला त्यांची दुचाकी बाजुला घेता आली नाही. यामुळे आरोपी बस चालक मधुकर याने बसमधून उतरुन फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि पसार झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.