आक्षेपार्ह वक्तव्य: आझम खान यांचा माफीनामा

0
313

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – बिहारमधील शिवहरच्या खासदार रमा देवी यांना उद्देशून अत्यंत गलिच्छ वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे खासदार यांनी अखेर लोकसभेत माफी मागितली आहे. ‘अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असे त्यांना वाटत असेल तर मी क्षमा मागतो,’ असे ते म्हणाले.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू असताना आझम खान यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या रमा देवी यांचे नाव घेऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. लोकसभेतील महिला सदस्यांनी आझम यांच्यावर टीका केली होती. तसेच, त्यांच्याकडून जाहीर माफीची मागणी केली जात होती. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात घेऊन आझम यांनी आज सभागृहाची माफी मागितली. त्यामुळे हा वाद आता शमण्याची चिन्हे आहेत.

रमा देवींनी डागली तोफ

आझम यांनी माफी मागितल्यानंतरही रमा देवी यांचा राग शांत झाला नाही. त्यांनी आझम यांना खडे बोल सुनावले. ‘आझम खान हे सतत अशी भाषा वापरत असतात. ती त्यांची सवय आहे. मात्र, त्यांनी सभागृहात असे बोलायला नको होते. त्यामुळे संपूर्ण देशाच्या भावना दुखावल्या आहेत. आझम यांनी आपली सवय सुधारायला हवी,’ असे त्या म्हणाल्या. ‘मी सभागृहातील ज्येष्ठ खासदार आहे. बिहारसारख्या राज्यातून संघर्ष करून, लोकांचा आवाज बनून इथवर पोहोचले आहे. असे वर्तन यापुढे सहन करणार नाही,’ असेही त्यांनी ठणकावले.