राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0
375

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांची बैठकही बोलावली आहे.  या बैठकीत भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करा, अशी मागणी केली.  त्यानंतर भाजपप्रवेशाच्या  घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष  सचिन अहिर यांनी शिवसेनेत नुकताच  प्रवेश केला आहे.  त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. त्या ३० जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.  आता गणेश नाईकही भाजपाच्या वाटेवर असल्याने  राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.