आकुर्डीत अवैध वृक्षतोड, पालिकेकडून कारवाईस टाळाटाळ – सिद्दीक शेख

0
181

आकुर्डी, दि. १२ (पीसीबी) – मागील आठवड्यात आकुर्डीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली. याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी केला आहे.

मागील आठवड्यात आकुर्डीमधील एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली. एका पालिका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलेल्या माहितीनुसार या वृक्षतोडीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच बेकायदेशीर ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. शिवाय याठिकाणहून वृक्षतोड करून झाडे वाहतूक करण्यासाठी 10 ते 12 मोठ्या गाड्या व ट्रेलर वापरण्यात आले. त्या गाड्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिका असे बोर्ड लावण्यात आलेले होते. ही झाडे तोडल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने त्यांची मुळे उखडून टाकून त्याठिकाणी मुरूम भरून पुरावे नष्ठ करण्यात आलेली आहेत. पूर्ण सपाटीकरण करण्यात आले. यावरून पालिकेचा उद्यान विभाग संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे, असे शेख म्हणाले.

या प्रकरणाची माहिती कळताच अपना वतन संघटनेचे कार्यध्यक्ष हमीद शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर यांनी बेकायदेशीर अवैध वृक्षतोड बाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , मुख्य उद्यान अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन यांना अवैध वृक्षतोड करणाऱ्या कंपनी मालक , ठेकेदारांवर व त्यांना अभय देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व वृक्षतोड प्रतिबंधक कायदा , तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 कलम 8(1) प्रमाणे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा महापालिकेकडून त्या ठिकाणचा पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी या प्रकरणात तत्परतेने भूमिका घेतील का ? असा प्रश्न शहरातील पर्यावरणप्रेमी विचारात असल्याचे शेख म्हणाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केली जात आहे. राजकीय पुढारी , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिशय पद्धतशीरपणे उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत आहेत. शहरातील पर्यावरणाच्या बाबतीत महापालिका प्रशासन अतिशय उदासीन दिसत आहे. नद्यांचा प्रश्न असो, सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रश्न असो किंवा शहरामध्ये उद्यान विभागाच्या संगनमताने होत असलेली अवैध वृक्षतोड असो, शहरात अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई केली जात नाही. खूपच पाठपुरावा केला तर नावापुरती कारवाई केली जाते, असे शेख यांनी म्हटले आहे.