अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
643

मुंबई, दि.५ (पीसीबी) – अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्यातील वन खात्यावर टीका केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दुःखद घटना आहे. पण या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पांढरकवड्यातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचे वनखात्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. यावरुन वनखात्यावर टीका होत आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी देखीर राज्य सरकारवर टीका केली होती. अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दु:खद बाब आहे. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करुन या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का?, याचा तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.