‘अलीबाबा’चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब; चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी घेतला होता पंगा

0
337

बीजिंग,दि.०४(पीसीबी) : श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते गायब झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.

दरम्यान उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांना बळ देण्यासाठी सरकारी सिस्टिममध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन जॅक मा यांनी केलं होतं. तसेच वैश्विक बँकिंग नियमांवरही टीका केली होती. त्यांच्या या भाषणाने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा तिळपापड उडाला. त्यानंतर जॅक मा यांचे दिवस फिरले. त्यांच्यामागे कम्युनिस्ट सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला. त्यांच्या अँट ग्रुपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओलाही रद्द करण्यात आले होते. एका वृत्तानुसार थेट जिनपिंग यांच्या आदेशानंतरच अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्यात आला आहे.