अर्थसंकल्प नागरिकांच्या दृष्टीने चांगला,काही कामांची उणीव – सचिन चिखले

0
125

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या दृष्टीने चांगल्या प्रकल्पांचा समावेश केला असला तरी काही कामांची उणीव देखील राहिली आहे, असे मत मनसेचा सचिन चिखले यांनी व्यक्त केले.

मागील कार्यकाळात मुंबई ते पुणे महामार्गावर अर्बन स्ट्रीट प्रकल्पाद्वारे फुटपाथ विकसित करण्यासाठी मनसेने पाठपुरावा केला. हा फुटपाथ झाल्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना पायी येण्याजाण्यासाठी उत्तम सोय झाली. निगडी ते पुणे बीआरटी मार्गासाठी विशेष तरतूद आणि मोशीतील 750 बेडचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प केल्यामुळे आयुक्तांचे विशेष अभिनंदन.

मात्र, शहरातील नागरिकांना चोविस तास पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेली योजना पूर्णपणे अपयशी ठरली. त्यावर केवळ चर्वीतचर्वण चर्चा केली जाते. मात्र, अंमलबजावनी होत नसल्याने शहरवासियांना आजही चोवीस तास पाणी दिले जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मागील वर्षात पाणी गळती रोखण्यात प्रशासनाला अपयश आले. कचरा संकलनाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. परंतु, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. ओला आणि सुका कचरा वेगळा करुन संकलीत केला जात नाही. त्यामुळे आजरोजी शहराच्या बहुतांश भागात कचऱ्याचे ढिग साचल्याचे पहायला मिळते, हे प्रशासनाचे दुर्भाग्य आहे.

तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदारांने काम दिले होते. चौकाचौकांचे सुशोभिकरण करुन टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ शिल्प तयार करुन त्याठिकाणी बसविण्यात आले. याकामी दिलेल्या निधीचे काय केले, याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यांची बदली झाल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी ठेकेदारांवर नियंत्रण ठेवले नाही. महत्वाचे म्हणजे मेट्रोच्या विस्तारिकरणासह विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्या अर्थसंकल्पात विशेष तरतुद केली. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वहिस्सा देण्याबाबत वाच्यता केली गेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेकडो उणीवा असल्याचे स्पष्ट होत आहे.