अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेची मते वाढतील, तर भाजपची कमी होतील – जयंत पाटील

0
738

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ  असून  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बांधायचे की नाही, किंवा ते कुठे बांधायचे हे निश्चित होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्येत जाऊन फायदा काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा ठळक करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि भाजप सरकारचे अपयश झाकण्यासाठी त्यांना राम मंदिराचा मुद्दा सुचला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपच्या आधी पहिल्यांदा तिथे जाऊन बोलले. याचा एकच फायदा होईल तो म्हणजे जर युती झाली नाही तर उत्तर प्रदेशात शिवसेनेची मते वाढतील  आणि भाजपची कमी होतील, असेही पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी  दिलेली प्रतिक्रिया  म्हणजे  ढोंग आहे. मुख्यमंत्री अशा प्रसंगी वेळ मारुन नेण्यात तरबेज आहेत. जर उद्धव यांना राम तुरुंगात आहे, असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रभू राम त्यांना अशिर्वाद कसे देतील? उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याचा राज्यातील आणि देशातील सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. उलट उद्धव ठाकरेंना दौरा करायचाच होता तर त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडून मग दौरा करायला हवा होता, असेही जयंत पाटील  म्हणाले.