आळंदीत समाईक जागेच्या वादातून चौघांना जबर मारहाण करत पिस्टलने जीवेमारण्याची धमकी

0
1203

आळंदी, दि. २५ (पीसीबी) –  समाईक जागेच्या वादातून सहाजणांनी मिळून एकावर कोयत्याने वार केला तसेच इतर तिघांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत पिस्टलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि.२४) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील कोयाळी खिरपाडवस्ती येथे घडली.

बाबुराव नामदेव कोळपे (वय २७, रा. कोयाळी खिरपाडवस्ती) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, अजय उर्फ बापु भाऊसाहेब कोळपे (रा. बालाजीनगर धनकवडी), राजेंद्र जांभळकर (रा. उरळगाव) आणि त्यांचे अज्ञात चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कोळपे आणि फिर्यादी बाबुराव कोळपे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांची कोयाळी खिरपाडवस्ती येथे समाईक जागा आहे. या जागेच्या वादातून त्यांचे वारंवार भांडणे होत असतात. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास समाईक जागेच्या वादातूनच आरोपी अजय, राजेंद्र आणि त्यांचे चार अनोळखी साथीदारांनी मिळून बाबुराव कोळपे, त्याचे वडिल नामदेव कोळपे, चुलते आणि भावजय यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. अजय याने बाबुराव यांच्या हातावर कोयत्याने वार केला. आणि पिस्टलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.