अमित शाह यांनीच कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं – संजय राऊत

0
319

मुंबई,दि.२२(पीसीबी) – एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थनाबरोबरच देशभरातून विरोध होऊ लागला आहे. कायदा लागू झाल्यानंतर आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये तीव्र अंसतोष उफाळून आला. देशाच्या इतर भागातही या कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “देशाचे गृहमंत्री नसताना अमित शाह म्हणायचे की, एका एका घुसखोराला निवडून निवडून बाहेर काढेल. आम्हाला ते चांगलं वाटलं. कारण बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढाव ही आमची इच्छा आहे. पण, मागच्या सहा महिन्यात त्यापैकी किती जणांना बाहेर काढण्यात आलं? कुणीही मोजलं नाही. दुसरीकडं धार्मिक आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात, यावरही आमचा विश्वास आहे. अफगाणिस्तानमध्ये शीखांवर अन्याय होतो. तेव्हा त्यांना लोकांना भारतात यायचं असेल तर त्यांना स्वीकारणं आपलं कर्तव्य आहे,” असं राऊत म्हणाले.

“असे किती लोक आहेत ज्यांना आश्रय दिला जाणार आहे, असं मी संसदेत सरकारला विचारलं होतं. त्यावर अमित शाह म्हणाले, लाखो करोडो लोक आहेत. मग जर तुम्ही लाखो करोडो लोकांना भारतात आणणार आहात, पण त्यांना कुठे वसवणार याविषयी कुणालाही माहिती नाही. सरकारनं संख्या ठरवली पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. देशातील माणसं भूकेले आहेत. त्यांच्याकडे रोजगार नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटला आहे. ही आग देशाला जाळेल. त्यामुळे सरकारनं त्यांचा निर्णय मागे घ्यायला हवा. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. याचा अर्थ असा की, सरकारनं चूक केली आहे,” असं राऊत यावेळी म्हणाले.