अमरावती जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन दरम्यान ‘या’ गोष्टी राहणार बंद

0
344

अमरावती, दि. १9 (पीसीबी) – कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरूवारी जारी केला. तसेच शुक्रवार 19 फेब्रुवारीपासून दररोज बाजारपेठा रात्री आठ वाजताच बंद होतील.

साप्ताहीक टाळेबंदी आदेशानुसार, या कालावधीत वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा वगळता अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत. दुध व भाजीपाला दुकाने रविवारी सकाळी 6 ते सकाळी 10 दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी वाहतूक, पालिकेची बससेवा, रिक्षा सेवा बंद राहील. आपतकालीन स्थितीत व रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वत:चे वाहन वापरता येईल. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी वाहतूक करता येईल. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या मालमोटारींना परवानगी आहे. 
 
जिमखाने, व्यायामशाळा, तरणतलाव, चित्रपटगृहे व बहुविध चित्रगृहे, ग्रंथालये, सलून, ब्युटी पार्लर, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, सर्व बांधकामे या कालावधीत बंद राहतील. कृउबास समितीचा भाजीपाला, फळ बाजार बंद राहील. सर्व पर्यटनस्थळे, उद्याने, बागा, बांबू उद्यान, वडाळी उद्यान, मेळघाट सफारी आदी बंद राहील. त्यामुळे रविवारी पर्यटकांनी तिथे गर्दी केल्यास कारवाई केली जाणार आहे. क्रीडा संस्था, बाह्य खेळांबरोबरच आंतरमैदानी खेळही बंद राहतील. रविवारी सेवा देणा-या बँका व वित्तसंस्थादेखील बंद राहणार आहेत. अनावश्यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीहून फिरणा-यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

दुध विक्री व डेअरी सकाळी सहा ते सकाळी दहा सुरु राहतील. सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका सुरु राहतील. ‘एमआयडीसी’मधील सर्व औद्योगिक आस्थापना कामगारांसह सुरु राहतील. मात्र, दक्षतापालनाबाबतची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिका-यांना त्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महावितरण वीजसेवा, मजीप्रा पाणीसेवा, गॅससेवा, रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, पेट्रोलपंप सेवा सुरू राहील. वृत्तसेवा, वृत्तपत्र छपाई, विक्री, वितरण, केबल सेवा, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स सेवा सुरु राहील. माध्यम प्रतिनिधींना त्यांच्या कामाकरिता संचाराची मुभा आहे.
 
संचारबंदीच्या तत्वानुसार पाच किंवा त्याहून लोकांनी एकत्र जमू नये. अनावश्यकरीत्या बाहेर पडू नये. घरात असावे. यादरम्यान अनावश्यक प्रवास करणा-यांवर कारवाईसाठी पोलिसांनी नाकेबंदी करून तपासण्या करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका व पोलिस यांच्याकडून संयुक्त मोहिमही राबवली जाणार आहे.