अन्वरांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा; कुणाच्या येण्या-जाण्याने पक्ष संपत नाही – प्रफुल्ल पटेल

0
721

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व खासदार तारिक अन्वर यांची इच्छा झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. परंतु त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला तो चुकीचा आहे. अन्वर यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा आहे. प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, पण याचा अर्थ पक्ष संपत नाही,  अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी आज (गुरूवार)  पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. राफेलप्रकरणी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांची पाठराखण केल्याने तारीक अन्वर यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की,  तारिक अन्वर यांनी शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी शरद पवारांना फोन करुन विचारायले हवे होते की, तुमचे  मत काय आहे. आम्हाला/पक्षाला न विचारता त्यांनी हे पाऊल उचलले आहे, जे चुकीचे आहे. दरम्यान, आम्ही तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु. लोकसभेच्या खासदारकीच्या राजीनाम्याचा प्रश्न अध्यक्षांकडे असतो. पवारांना दिला असता तर आम्ही वेगळा विचार केला असता, असे पटेल म्हणाले.