अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध

0
61

अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील वर्षी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने सर्वेक्षण झाले नाही. मात्र आता पुन्हा या परिसरात ग्रामसभेची मान्यता न घेता ड्रोनद्वारे सर्व्हे केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला विरोध असताना येथील सर्वेक्षणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने सर्व्हे साठी या भागात ड्रोनचा वापर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू असल्याने या क्षेत्रात कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास त्या प्रकल्पाला ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. असे असताना या भागात पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन फिरतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अंजनावळेच्या ग्रामपंचायत सदस्य दिनाबाई कोकणे यांनी देखील आमची फसवणूक करून सर्वे केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोक आम्ही सहज ठाणे जिल्ह्यातून पाहुणे म्हणून आल्याचे सांगत त्यांनी ठेकडावर जाऊन परिसराची पाहणी केली. त्यांच्याकडे ड्रोन, दुर्बीण असल्याने तुम्ही कशासाठी आलात ? काय बघता ? इथं तुम्ही सर्वेसाठी आलात का, अशी विचारणा करत ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावले.

पुढे कोकणे म्हणाल्या, गेले तीन दिवस अंजनावळे परिसरात ड्रोन फिरत होते, आमचा या प्रकल्पाला पुर्णपणे विरोध आहे, आम्ही ही जागा सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये २८ जून २२ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार उर्जा साठवण प्रणाली तसेच इतर अक्षय ऊर्जा स्त्रोत प्रकल्पाच्या घाटघर व अंजनावळे ता.जुन्नर गावातील सर्व्हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी मार्फत करण्यात येणार आहे. त्यांना सहकार्य करावे असे पत्र तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मागील वर्षी दोनही ग्रामपंचायतीला दिले होते.