अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे; ३८५ कोटींच्या घोटाळ्याने हे महामंडळ आले होते चर्चेत

0
977

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील अमित गोरखे यांची निवड करण्यात आली आहे. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना महामंडळाच्या अध्यक्षांनी तब्बल ३८५ कोटींचा घोटाळा केल्याने हे महामंडळ चर्चेत आले होते.

गोरखे हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच ते शहरातील शिक्षण सम्राट म्हणूनही ओळखले जातात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे सुमारे ३०० कोटींचे अर्थसंकल्प आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम केले जाते.

याआधीचे महामंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी या महामंडळात तब्बल ३८५ कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रमेश कदम हे सध्या तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. कोणतीही प्रक्रिया न राबवता महामंडळात ७३ जणांची भरती करणे, नियुक्त झालेल्यांना २० लाखांचे कर्ज देऊन १५ लाखांची लाच घेणे, कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या करणे, महालक्ष्मी दूध संस्था आणि बारामती दूध संघाला कागदोपत्री ५ कोटी रुपये देणे आणि विधानसभा निवडणुकीत साडे सहा कोटी रुपये वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.