भोसरीच्या अण्णासाहेब मगर बँकेत घोटाळा; बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडेंनी राजीनामा देऊन पळ काढला

0
835

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – भोसरीच्या राजकारणातील एक महत्त्वाची संस्था असलेल्या अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी अध्यक्षपदासोबतच संचालकपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या बँकेत आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशीच्या भितीने लांडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप आणि आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी लांडे यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच या प्रकरणावर येत्या २० मार्च रोजी सुनावणीही होणार आहे.

परंतु, या सुनावणीपूर्वीच नंदकुमार लांडे यांनी गेल्या महिन्यात बँकेचे अध्यक्षपद आणि संचालकपदाचा राजीनामा देऊन पळ काढला आहे. त्यांनी सहकार आयुक्त व निबंधक यांना २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राजीनामापत्र पाठवले आहे. त्यामध्ये वैय्यक्तिक कारणांमुळे बँकेचे अध्यक्ष आणि संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशी होण्याच्या धास्तीनेच त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. परंतु, त्यांनी राजीनामा दिला असला तरी चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे कायम राहणार आहे. यासंदर्भात नंदकुमार लांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.