अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र मंचावर

0
190

पुणे, दि. ३० (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवारआणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत आहेत. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण
पुण्यातील भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनावरुन महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यानंतर सत्ताधारी विरोधकांनी मध्यम मार्ग स्वीकारत देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात 1 जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे.