अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यात आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक

0
247

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ या दोन जिल्ह्यातील पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी पवार ठाकरे यांची भेट घेत आहेत.अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे आम्हाला नाराज होण्याचा काहीच प्रश्न नाही. आम्ही ठाकरे गटासोबतच आहोत. येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे गटासोबत जाण्याची आमची मानसिकता असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

मागील सहा महिन्यामध्ये परिस्थिती बदलल्याचं अजित पवार सांगायला विसरले नाहीत. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक, बीएमसी निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्व भोंडवे, मयूर कलाटे आणि शिवसेनेकडून राहुल कलाटे यांची नावे स्पर्धेत आहेत. राहुल कलाटे हे सर्वात तगडे उमेदवार समजले जातात, कारण २०१४ आणि नंतर २०१९ मध्ये त्यांनी आमदार जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. गतवेळी जगताप यांनी दीड लाख तर कलाटे यांनी सर्वपक्षांचा पाठिंबा असल्याने १ लाख १२ हजार मते मिळाली होती.

काटे, कलाटे यांनी मतदारसंघात प्रचार मोहिम सुरू केली आहे. चिंचवडची निवडणूक भाजप विरोधात महाआघाडी अशीच व्हावी अशी पवार यांची भूमिका आहे. कसबा मतदारसंघाटी जागा काँग्रेसला तर चिंचवडची राष्ट्रवादीला असेही वाटप चर्चेत आहे.