‘अजित दादांची गॅरंटी नाही’ – निलम गोऱ्हे

0
196

गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा” – मनसे नेते गजानन काळे यांच्या विधानाने खळबळ

पुणे, दि. ७ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे काही अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असूनही सहभागी झाले. पण त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ असं स्पष्ट विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे मनसे नेते गजानन काळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय.

खरंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीवर गजानन काळे यांनी कालच धक्कादायक दावा केला होता. “शरद पवार आजारी असून कार्यक्रमात येतात. पण अजित पवार वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात हे पचनी पडत नाही. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा”, असं गजानन काळे म्हणाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली होती तेव्हा ते बरेच दिवस महाराष्ट्राबाहेर गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा सर्व आमदारांना गुवाहाटीला घेऊन जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. असं असताना अजित पवार यांच्या देखील नाराजीची चर्चा सुरुय. त्यामुळे अजित पवारही बंडखोरी करुन गुवाहाटीला जातात का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. त्याबाबतचा इशार गजानन काळे यांनी आधीच दिलाय. त्यानंतर त्यांनी आज निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत आपण खरं म्हणत असल्याचं म्हटलंय.

भाजपच्या पालकमंत्र्यांकडून विरोधकांना निधी दिला जात नाहीय का? असा काहीसा प्रश्न आज पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर निलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडताना अजित पवारांची गॅरंटी नाही, अशा प्रकारचं विधान केलं. पण त्यांच्या या विधानावरुन मनसे नेते गजानन काळे यांनी वेगळाच दावा केलाय.

“पूर्वी गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हा मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे, फक्त आरोप म्हणून आरोप करत नाहीय. गिरीश बापट राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने निधी द्यायचे. आता तसं राहीलं नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. महाविकास आघाडी तयार झालीय. त्याचबरोबर अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाहीय. परत त्यांना बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे. पूर्वी जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं आमची मविआ सहकारी दिसत आहेत. मला तर आमदार म्हणून अजिबात निधी दिला नव्हता. आम्ही काल-पर्वा खूप पाठपुरावा केल्यावर थोडाफार निधी देतो सांगितलं. तीन-तीन वर्ष कामं मंजूर झाल्यानंतरही निधी मिळत नव्हता”, अशी सविस्तर प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिलीय.