अजितदादा, आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो; गिरीश बापटांची कोपरखळी

0
1193

पुणे, दि. ९ (पीसीबी) – अजितदादा, आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो, अशी कोपरखळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. तर अजित पवारांनीही बापट यांना स्मितहास्य करून दाद दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (बुधवारी)   गिरीश बापट आणि अजित पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यावेळी प्रशासन चालवत असताना कठोर कसे रहावे, याचा सल्ला माजी पालकमंत्री अजित पवार यांनी  गिरीश बापट यांना दिला.

देवस्थानांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरुन  दोघांमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी  अनेकदा देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. त्यामुळे काही वेळेस नियम पाळले जात नाही, असे बापट यांनी सांगितले. तर यावर अजितदादा म्हणाले की, कोणी मागणी केली म्हणून एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करायला नको. पालकमंत्र्यांनी कठोर राहायला हवे, असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या या सल्ल्यावर, दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो, अशी कोपरखळी केली.  यानंतर दोन आजी माजी पालकमंत्र्यांच्या  शाब्दीक कोटींवर उपस्थित खासदार, आमदार, आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.