अदानी-अंबानींचा टेम्पो भरून काळा पैसा, पंतप्रधान मोदी करतात काय ?

0
30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पंतप्रधानांचं, एका जबाबदर व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून या मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करावा, तसेच अदाणींसह अंबानींना अटक करावी. राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तेलंगणातील दोन प्रचारसभांचा दाखला दिला. तसेच या संभाद्वारे मोदी यांनी पहिल्यांदाच अदाणी आणि अंबानींचा जाहीरपणे उल्लेख केला असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या (बुधवार, ७ मे) दोन सभांमध्ये काँग्रेस पक्षावर टीका केली. ती टीका करत असताना त्यांनी एक आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. या दोन उद्योगपतींनी राहुल गांधी यांना (काँग्रेसचे प्रमुख नेते) टेम्पो भरून काळा पैसा पुरवला आहे. हे देशाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. ज्या मोदींनी गौतम अदाणींना हा देश विकत घ्यायला मदत केली, येथील सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं २० लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, त्याच अदाणींवर मोदी आता आरोप करू लागले आहेत.

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, सावकार आणि शेठजींच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे गौतम अदाणी आणि मुकेश अंबानींचं नाव घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. हेच मोदी आता त्यांच्या स्वतःच्या अर्थ दात्यांवर हल्ला करू लागले आहेत. अदाणी आणि अंबानी हे भाजपाचे अर्थ दाते आहेत. त्यांच्यावरच आता मोदी आरोप करू लागले आहेत. याचा अर्थ ते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी अंबानी आणि अदानी यांचं नाव घेतलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे.

राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरून काँग्रेसकडे जातोय. त्या पैशावर काँग्रेस निवडणूक लढत आहे. याचा अर्थ असा आहे की मोदींना या भ्रष्टाचाराची, या गैरव्यवहाराची माहिती आहे. हे पीएमएलए अंतर्गत मनी लॉन्डरिंगचं प्रकरण आहे. त्यामुळे मोदी यांनी सक्तवसुली संचालनालयाला सांगून या दोन उद्योगपतींना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मोदी आणि भाजपा गेल्या काही वर्षांपासून या पीएमएलए कायद्यांतर्गत विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करत आहे. त्याच कायद्याखाली त्यांनी आता अदाणी आणि अंबानींवर कारवाई केली पाहिजे.