अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, खरं सांगा पिंपरी-चिंचवडचा सर्वत्र समान विकास का झाला नाही?

0
1323

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, त्याची सुरूवात राष्ट्रवादीने केली. शहराचा विकास राष्ट्रवादीनेच केल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात सर्वच भागात समान विकास झालेला नाही हे वास्तव आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास, पिंपरी विधानसभा मतदारसंघात कमी विकास आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ भकास?, असे चित्र कोणामुळे निर्माण झाले याचे उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदारांना देणे अपेक्षित आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकास का, कसा झाला याचे विवेचन करताना आमदार लक्ष्मण जगताप यांचे खमके नेतृत्व कारणीभूत असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्यच करावे लागणार आहे. शहरातील मतदार सुज्ञ असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना फसवण्याच्या फंदात पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरूद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरूद्ध राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरूवात केली आहे. यंदाच्या निवडणूक प्रचाराची सुरूवात राष्ट्रवादीने केली. त्यामुळे प्रचारात सध्या राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जातील तेथे पिंपरी-चिंचवडचा विकास राष्ट्रवादीनेच केल्याचा दावा करत आहेत. परंतु, हा दावा करत असताना ते सत्य लपवत आहेत. राष्ट्रवादीने शहराचा विकास केल्याचा या नेत्यांचा दावा असेल, तर शहराच्या सर्व भागात समान विकास झालेला नाही?, याचे भान या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ठेवणे गरजेचे आहे.

शहराचा सर्व विकास चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकवटला आहे. त्या तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघात कमी विकास झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघ तर अजूनही भकासच राहिला आहे. हे वास्तव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे सगळीकडे राष्ट्रवादीच्या विकासाचे ढोल बडवताना सध्या दिसत आहेत. पार्थ पवार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्ये आधी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे आहे. पार्थ पवार यांचे सध्या हेवत उडणारे विमान अजूनही पिंपळेसौदागर, वाकड व चिंचवडच्या अन्य विकास झालेल्या भागातूनच फिरत आहे. त्यांनी रिक्षातून शहराच्या प्रमुख मार्गावरून प्रचार केला असला तरी त्यांना अजूनही शहराची संपूर्ण माहिती नसल्याचे स्पष्ट होते. अजितदादांना शहराचा विकास करताना दूरदृष्टीचा अभाव होता, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मान्य करणे गरजेचे आहे.

अजितदादांना विकासाची दूरदृष्टी असती, तर विकास करण्यासाठी सर्वाधिक वाव असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले असते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. राष्ट्रवादीला दहा वर्षात भोसरी मतदारसंघात साधा एक बीआरटीएस मार्ग सुरू करता आलेला नाही. यावरून राष्ट्रवादीचे नेते सार्वजनिक वाहतुकीबाबत किती निष्क्रिय होते, हे स्पष्ट होते. पीसीएमटी आणि पीएमटीच्या विलीनीकरणाचा अजितदादांचा निर्णय किती घोडचूक होती हेही वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी हे अनेकदा मान्य केलेले आहे. राष्ट्रवादीने गोरगरीबांना घरे देण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघात चिखली येथे सुरू केलेला घरकुल प्रकल्प आजही रडतखडत सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीला गरीबांच्या विषयी किती कळवळा होता आणि आहे, हे स्पष्ट होते.

राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी विधानसभा मतदारसंघात एखादा मोठा प्रकल्प राबवला आणि तो योग्य प्रकारे सुरू झाल्याचे कोठेच चित्र नाही. या मतदारसंघातून जाणारा आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ता असलेल्या निगडी ते दापोडी मार्गावर सर्वात आधी बीआरटीएस रस्ता तयार झाला. परंतु, विकास केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या राष्ट्रवादीला तो मार्ग सुरू करता आला नाही. याउलट चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन बीआरटीएस मार्ग सुरू झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात दहा वर्षापूर्वी सुरू झालेला एखादा प्रकल्प रेंगाळला आणि रखडला आहे याचे एकही उदाहरण देता येणार नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारखे खमके नेतृत्व होते म्हणून या मतदारसंघात विकासाची गंगा आली, हे अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठे मन करून मान्यच करावे लागणार आहे. तसेच शहरातील मतदार सुज्ञ आहेत, याचे भान या सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.