अंतराळ स्थानक निर्मितीचे भारताचे नियोजन; इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती

0
506

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे भारताने नियोजन केले आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत आहे,  असे डॉ. सिवन यांनी यावेळी सांगितले

दरम्यान, भारताने २०२२ मध्ये आपल्या ७५ व्या स्वातंत्र्यवर्षपूर्तीनिमित्त अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली असेल. यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून तयारीही सुरु असल्याचे आण्विक ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी  सांगितले.

त्याचबरोबर चांद्रायन-२ नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.