कोरोना आख्यान भाग १ – अविनाश चिलेकर

0
683
  • कोरोनाचे दुखणे आणखी दोन-चार महिने, नंतर काय…
  • सण, समारंभ, लग्न सोहळा तूतार्स विसरा…

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोनाची महामारी इतक्यात आपली साथ सोडणार नाही, असे नुकतेच (दि.२१) स्पष्ट केले. पुणे, मुंबईतील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ३ मे रोजी संपणारी टाळेबंदी कदाचीत ३१ मे किंवा पुढे जून अखेरपर्यंत चालेल असेही सांगण्यात येते. पुढे पावसाळा असल्याने त्या काळात कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करतात. दरम्यान, या साथीवर लस शोधण्याचे काम विश्वभरात सुरू आहे. किमान दीड वर्षे लस यायला लागतील, असे संशोधन करणारे सांगतात. पुणे सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनीही लस येण्यासाठी १८ महिने वाट पहा, असे म्हटले. थोडक्यात काय तर इतक्यात टाळेबंदी उठत नाही आणि लसही उपलब्ध होणार नाही हे त्रिवार सत्य. म्हणजेच आज या साथीवर मात करणे वाटते तितके सोपे राहिलेले नाही. एक मात्र नक्की आहे, हे संकट देशासाठी इष्ठापत्ती ठरू शकते. पिंपरी चिंचवडकरांसाठीही ही निकराची लढाई आहे. प्रसंग बाका आहे. काळ खूपच कठिण आहे. धीर सोडू नका, कारण रात्रीनंतर उजाडते हे लक्षात असू द्या.

महिना-दीड महिन्यांच्या लॉक डाऊन मुळे लोकांची कोंडी झाली.पूर्ण बाजारपेठ बंद पडली. कारखानदारी ठप्प झाली. चलनवलन, उलाढाल एकदम थांबली. रोजंदार मजुरांचे हाल पहावत नाहीत. मध्यमवर्ग सुध्दा मेटाकुटीला आला. कारखानदार, व्यापारी, बिल्डर, सराफ यांच्यासह तमाम धनिक मंडळीसुध्दा आता हातघाईवर आलेत. सारे जग चिंताग्रस्त आहे. कोरोनामुळे युरोप, अमेरिकेत हाहाक्कार माजला.  आपल्या देशातही प्रसार कमी होत नाही, तर वाढतोच आहे. पुणे-मुंबई शहरांतील कोरोनाची लागन आणि मृत्यू घोर लावणारी आहे. विळखा आणखी घट्ट होताना दिसतोय. उद्या आपल्याला हॅस्पिटलसुध्दा पुरणार नाहीत, इतका मोठा उद्रेक होऊ शकतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे. हे कुठवर चालणार सांगता येत नाही, मात्र किमान दोन वर्षे हाताची घडी तोंडावर बोट अशीच अवस्था राहणार आहे. असेच झाले तर उद्याचे काय हा गंभीर प्रश्न आहे. कारखानदारीचे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती राहिल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारणावरही याचा किती खोलवर परिणाम होणार तेसुध्दा महत्वाचे आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी इतकेच सोशल डिस्टंन्सिंग (सामाजिक अंतर) महत्वाचे आहे.   सर्व क्षेत्रात ते राहणार. याचाच अर्थ गर्दी टाळायची आहे. आपले सण, समारंभ, सोहळे, लग्न, साखरपुडा, टिळा याच बरोबर मयत, दशक्रिया, वर्षश्राध्दाला आता गर्दी नसेल. हे सारे घरगुतीच राहील. पिंपरी चिंचवडमध्ये एक लग्न म्हणजे किमान हजार-दोन हजार माणसांची गर्दी असते. अगदी दुखद घटना म्हणजे मयत, दशक्रीयेलासुध्दा हजार पाचशे लोक जमतात. आता ते चालणार नाही. कोरोनाने त्याला बंधन येणार. शहरात वर्षाकाठी वाजतगाजत किमान दोन हजारावर लग्न होतात. त्यातील उलाढाल ही शेकडो कोटींची असते, ती आता कमी होणार. लग्न म्हटल्यावर घोडा, बँड, स्टेज, सजावट, मिरवणूक आली. त्यातून शेकडो हातांना काम मिळते. आता हा रोजगार बुडाल्यात जमा आहे. लाख, दोन लाख रुपये भाडे घेणारी लहान-मोठी सुमारे दोनशेवर मंगल कार्यालये पुणे पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. आता कुठेही गर्दी करायची नाही म्हटल्यावर या कार्यालयांचे बुकींग गेले म्हणून समजा. भोजनावळींवर लाखो रुपये खर्च होतो. पाच फूट अंतर ठेवून बसायचे म्हणजे पंगतीची गंमत संपली. त्यामुळे वाढपी, आचारी, साफसफाई कर्मचारी यांचे काम कमी झाले. तो रोजगार गेला. निमंत्रणे पत्रिका किमान दोन-तीन हजार असतात. आता छपाई एवजी लोक व्हाटस्अपवर आवतान धाडतील. म्हणजे तोही धंदा बुडाला. दोन्ही शहरांतील फक्त लग्न सोहळ्यांवर होणारी उलाढाल ही किमान हजार कोटींची असणार. आता कितीही पैसेवाला असू देत ती मिजास चालणार नाही. खरे तर हा सोहळा घरगुतीच असतो. आता लग्न करायचेच तर पूर्वी प्रमाणे १००-२०० वऱ्हाडी मंडळींत वैदीक पध्दतीने अथवा नोंदणी विवाह सोयिचा असणार आहे. हे झाले फक्त लग्नाचे. दुखद घटना घडली की तिथेही हीच बंधने असणार. अंत्यविधी, दशक्रीयेलासुध्दा गर्दी चालणार नाही. दहाव्याला घाटावर एखाद्या महाराजांचे प्रवचन असतेच. पूर्वी असे काही नव्हते, पण अलिकडे ती प्रथा कायम झाली. आता या प्रवचनकार महाराजांची सद्दीही संपल्यात जमा आहे. थोडक्यात यापुढे दशक्रीया विधीसुध्दा घरगुतीच करावा लागणार अशी शक्यता आहे.