‘गिरीश बापट , डाळ कुठे आहे ? – आम आदमी पार्टी मुकुंद किर्दत

0
717

पुणे, दि.२६ (पीसीबी) – कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे गोरगरिबांना दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सरकारकडून देखील याबाबत उपाययोजना सुरु आहे.

मात्र याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सवाल उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘कोरोना लागणीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हातावर पोट असलेल्यांसाठी शिधा पत्रिकेवरील धान्य हाच एकमेव आधार राहिला आहे. अशा स्थितीत मोफत रेशनची घोषणा केंद्र सरकारने करून एक महिना झाला तरी अजून केंद्राकडून डाळ आलीच नाही,’ असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘जनतेने नुसत्या तांदुळावर स्वतःला जगवले आहे. मराठी माणसाच्या जेवणात भरड धान्य आणि डाळ ह्याचा समावेश असतो. असे असताना महामारीच्या आणि आणीबाणीच्या काळात तातडीने पुरवठा करण्यातील अपयश हा सरकारच्या प्रशासकीय कौशल्यावरील मोठे प्रश्नचिन्ह आहे, असे किर्दत म्हणाले.

‘आपल्या पुण्यात डाळीचा विषय आला की गिरीश बापट यांचे नाव येते. गिरीश बापट यांनी अन्न धान्य पुरवठा मंत्रालय सांभाळले आहे. आणि पुणेकरांनी त्यांना मोठ्या मतदानाने खासदार म्हणून निवडून दिले आहे. परंतु आज रेशन साठीची ओरड चालू असताना पुण्याचे खासदार कुठेच दिसत नाहीत . ‘गिरीश बापट , डाळ कुठे आहे ? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे,’ असे मुकुंद किर्दत म्हणाले.

दरम्यान, ‘खरेतर त्यांनी पुढे येऊन केंद्राकडून डाळ मिळवायला हवी. त्यांना रेशन दुकाने व परमिटचा चांगला अभ्यास आहे, त्याचा उपयोग निदान या महामारीच्या काळात जनतेचे रेशन प्रश्न सोडवण्यासाठी करावा,’ अशी मागणी पुणेकर जनतेच्या वतीने आम आदमी पार्टी केली आहे.