आंबेगावात वळसे पाटील-आढळराव सामना रंगणार?

0
376

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व पक्षातील उमेदवारांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. दिल्ली नाही तर कमीत कमी मुंबईत तरी जाऊ अशी इच्छा मनी बाळगून या उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. औरंगाबाद माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्या पाठोपाठ आता शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत झालेले उमेदवार शिवाजाराव आढळराव पाटीलही तयारीला लागल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू झाली आहे.

शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांना पराभव दाखवला. राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी केली. त्याला अपेक्षेप्रमाणे यशही आले आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून शिरूर मतदार संघ जिंकण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा सिद्ध झाला. आता तोच मनसुबा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीला समोर ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांनी मागील २९ वर्षांपासून या मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मतदार संघातून शिवसेनेला आघाडी मिळत आली आहे. त्याचे कारण म्हणजे, आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र होते. तसेच वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात सोटेलोट असल्याचे बोलल जात होते. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साटलोट्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.