ब्लॅकमेल करणाऱ्या युवराज दाखले विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा

0
1033

वाकड, दि. ३० (पीसीबी) : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरांवर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या युवराज दाखले विरोधात वाकड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दाखले याने अनेक नागरिकांकडून लाखो रुपये उकळले असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी दाखले विरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

दाखले हा शिवशाही व्यापारी संघ व तिरोडा विधानसभा मतदार संघाचा शिवसेना संपर्क प्रमुख आहे. दाखले हा काळेवाडी-थेरगाव परिसरातील प्राधिकरणाची अनधिकृत घरे अधिकृत करून देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांकडून ३० हजार रुपये घेत होता. तर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून प्राधिकरणाच्या हद्दीमधील अनधिकृत बांधकांमांवर कारवाई करावी अशी मागणी करत होता. प्राधिकारणाने नागरिकांना नोटीस बजावल्यानंतर दाखले तुमचे घर पाडू देणार नसल्याचे आश्वासन देऊन पैसे उकळत होता.

युवराज दाखले हा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो काढून आपले आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध असल्याचे नागरिकांना भासवत होता. तसेच वरिष्ठ यांनीच आपल्याला संपर्क प्रमुख केले आहे. त्यामुळे आपले राजकीय वजन वापरून तुमचे घर पाडू देणार नसल्याचे नागरिकांना सांगून दिलासा देत होता. त्या बदल्यात तो ३० हजार रुपये घेत होता. अशा प्रकारे त्याने अनेकांना गंडा घातला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. अशा नागरिकांनी वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी.एम. भोगम करीत आहेत.