दहा ते बारा दिवसांत आचारसंहिता लागू -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
563

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – आगामी विधानसभेची १० ते १२ दिवसांत आचारसंहिता लागेल. असा अंदाज महसुल मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे वर्तवला. पालकमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांची आढावा बैठक आज महापालिकेत घेतली. त्यांनतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्या वेळी महापौर राहुल जाधव, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, “शहरासंदर्भात राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेले विषय पुर्ण करण्यासाठी १० ते १२ दिवस असून त्यानंतर आचारसंहिता लागेल. आचारसंहिता ३५ दिवस राहणार असल्याने नवीन सरकार आल्यानंतरच बाकी राहिलेले प्रलंबित विषय मार्गी लावता येतील. तसेच महापालिकेचे मंत्रालयातील कामकाज जलदगतीने करण्यासाठी चांगल्या माणसाची नियुक्ती केली आहे.”

पाटील पुढे म्हणाले की, “पवना नदी पाणीपुरवठा वाहीनीचा प्रकल्प २०११ पासून रखडला असून शेतकऱ्यांबरोबर सामंजस्याने तो विषय सोडला जाणार आहे. पिंपरी चिंचवडला पाणी दिल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळणार नाही, असा शेतकऱ्यांचा समज असल्याने त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र, याच प्रकल्पासून शेतीसाठी पाईपलाईनची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळेे लवकरच या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागेल.” दरम्यान, या प्रकल्पाला मावळचे आमदार बाळा भेगडे यांचा विरोध असल्याचा गैरसमज करू नये. असे पालकमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले.

घनकचरा व्यवस्थापनाचे कौतुक

महापालिका शहरातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत असून आगामी काळात कचरा व सांडपाण्यापासून वीजनिर्मिती करता येऊ शकते. तसेच वायसीएममधील पद्युत्तर संस्थेचा खर्च महापालिकेला परवडत नसल्याने प्राध्यापकांचे पगार व महात्मा फुले आरोग्य योजनेतून होणाऱ्या उपचारांचा खर्च राज्य शासन महापालिकेला देणार आहे. अशी माहिती यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिली.