महापालिकेची प्लास्टिक विरोधी धडक कारवाई, ८० हजारांचा दंड वसूल

0
394

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – सलग तीन दिवसांचे सुट्टीचे औचित्य साधून पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी मार्केटमधील काही भाग येथे बंदी असलेल्या प्लास्टिकबाबत पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत आज शनिवारी कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण ८० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला असून दंड भरण्यास नकार देणाऱ्या तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ही कारवाई आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहा. आरोग्य अधिकारी कुलकर्णी संजय, मुख्य आरोग्य निरिक्षक बेद राजू यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक सुरेश चन्नाल, सदाशिव पुजारी, शेखर निंबाळकर, योगेश फल्ले, शांताराम माने, सतिश इंगेवाड, बाबासाहेब राठोड; तसेच आरोग्य मुकादम पुखराज रेणवा, आरोग्य कर्मचारी प्रशांत पवार, स्वदेश साळुंके, अरूण राऊत, सचिन छपरीबंद, विशाल दाभाडे, शामराव ठाकर, अजय साबळे, विकास शिंदे, शाम कोटियाना, प्रभाकर शिंदे, शैलेश भोसले, दत्तात्रय ढगे, मंगेश बाबर, सागर जाधव, अमर वाल्मिकी, विनायक सौदा, सागर विटकर; वाहनचालक चंद्रसेन बोराटे, हनुमंत सुरवसे, रविंद्र निला यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या दुकानांवर झाली कारवाई

सदगुरु किराणा, भावना इमिटेशन्स, पुजा ट्रेडर्स, गुडविल कलेक्शन, आर. आर. कॉफी विहार, रेखा एंटरप्राइजेस, पवन प्रोडक्ट्स, बालाजी हाऊस किपिंग, सागर ट्रेडर्स, साई फरसाण, जयशंकर डेअरी, अफगाण ड्रायफ्रुट, जगदंब ट्रेडर्स, के.डी.एस., महालक्ष्मी शॉपी, बालाजी शॉपी यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व प्रत्येकी ५ हजार रूपये प्रमाणे एकूण ८० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त ३ दुकाने गोविंद ड्रायफ्रूट, झुलेलाल ड्रायफ्रूट, कैलास क्रॉकरी या दुकानांनी प्लास्टिक जप्त करण्यास विरोध केला व दंड भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या दरम्यान व्यापाऱ्यांनी जमाव गोळा करून कारवाईस विरोध केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तद्नंतर काही दुकानांवर कारवाई केल्यावर व्यापाऱ्यांनी पुढील ७ दिवसांत सर्व असलेले प्लास्टिक नष्ट करून यापुढे प्लास्टिक न वापरणेबाबत आश्वासन दिल्यावर कारवाई थांबविण्यात आली. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी पीसीबीला दिली.