पिंपरी मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अण्णा बनसोडे विजयी  

0
1128

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा १९ हजार ५४८ मतांनी पराभव केला. बनसोडे पिंपरी मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. आता दुसऱ्यांदा त्यांनी आमदारकीवर आपले नांव कोरले आहे.

शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पिंपरीतील आंबेडकर चौकात सभा घेतली होती. तर राष्ट्रवादीच्या एकाही मोठ्या नेत्यांची सभा मतदारसंघात झाली नव्हती. पण मतदारसंघातील वैयक्तिक संपर्काच्या जोरावर त्यांनी विजय खेचून आणला . राष्ट्रवादीने पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना आधी उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. पक्षाचा हा निर्णय बनसोडे यांनी योग्य असल्याचे विजयातून दाखवून दिले.

पिंपरी मतदारसंघात एकूण १८ उमेदवार होते. मात्र खरी लढत बनसोडे आणि चाबुकस्वार यांच्यामध्येच झाली. चाबुकस्वार यांना ६६ हजार ५७६ मते पडली. तर बनसोडे यांना ८६ हजार १८४ मते पडली. पोस्टल मते चाबुकस्वार यांना २०० मिळाली, तर बनसोडे यांना ११२ मिळाली.