महापालिका प्रशासन तपासणार सर्व लिपिकांची प्रमाणपत्र?

0
502

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – लिपिक पदासाठी बनावट टाईपिंग (टंकलेखन) प्रमाणत्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन सेवेत असलेल्या सर्वच लिपिकांची टाईपिंग प्रमाणपत्रे तपासण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बनावट प्रमाणपत्र सादर करण्याऱ्या ३१ लिपिकांना पदावनती देऊन पुन्हा वर्ग चारच्या पुर्वीच्या ठिकाणी रूजू केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.   

पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्ग तीन या लिपिक पदासाठी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी बनानट टाईपिंग प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन जागे झाले असून अगोदर सेवेत लागलेल्या सर्वच लिपिकांची टाईपिंग प्रमाणपत्रे तपासण्याचा विचार करत आहे. तसेच नव्याने सेवेत घेणाऱ्या लिपिकांचीही प्रमाणपत्रे तपासली जात आहेत.

काय आहे प्रकरण

दहावी पास व टाईपिंग मराठी ३० तर इंग्रजी ४० वेग असलेल्या वर्ग चारच्या १३० कर्मचाऱ्यांना २०१७ मध्ये पदोन्नती देत त्यांची लिपिकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी टाईपिंगची बनावटे प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी २०१८ मध्ये महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे प्रशासनाने सर्वांची प्रमाणपत्रे महाराष्ट्र परिक्षा परिषदेकडे तपासणीसाठी पाठवली. काही दिवसांत त्याचा अहवाल आल्यानंतर त्यातील ३१ कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर या ३१ जणांवर कारवाई करत त्यांची पदावनती करण्यात आली. तसेच त्यांची खाते निहाय चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, त्यांनी फसवणूक करून महापालिकेडून लिपिक पदाचे घेतलेले वेतन महापालिकेने वसूल केलेले नाही. दरम्यान, त्यांनी त्या पदावर काम केले असल्याने त्यांच्याकडून ते वेतन वसूल केले जाणार नाही. असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अनेक लिपिकांना टाईपिंगमध्ये कासवगती

कारभरात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने डिजिटलाइजेशनवर जोर दिला आहे. त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण तर लिपिकांना याच्यासह टाईपिंग अनिवार्य केले आहे. मात्र, महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अनेक लिपिकांना टाईपिंग करताना एक-एक अक्षर शोधावे लागते. अशी व्यक्ती लिपिक पदावर असेल तर प्रशासनात गतीमानता कशी येईल, असा प्रश्न सामाजिक कार्यकत्यांनी उपस्थित केला आहे.