प्राधिकरणाकडून रहाटणीत अभ्यासिकेची उभारणी; आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते उद्घाटन

0
425

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने रहाटणी, पेठ क्रमांक ३८ मध्ये अभ्यासिका केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत गोडी निर्माण करण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, उपअभियंता आदी उपस्थित होते.

सांगवी-रावेत बीआरटीएस रस्त्याच्या शेजारीच २ हजार ५८१ चौरस मीटर जागेत ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्यासाठी १ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ही इमारत रहाटणी व परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून उपयुक्त ठरेल. अभ्यासिकेजवळ २०० दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नियोजनबद्ध वातावरण तयार करण्यात आले आहे.

या इमारतीच्या बाजूने जॉगिंग ट्रॅकही करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना दररोजच्या व्यायामासाठी त्याचा वापर करण्यास उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही इमारत देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षा अभ्यासाचे आणि मार्गदर्शनाचे शहरातील एक चांगले केंद्र म्हणून नावारुपाला यावे, अशी अपेक्षा आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली आहे.