पोटनिवडणुकीची उद्यापासून रणधुमाळी

0
266

चिंचवड, दि.३० (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना उद्या (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असून 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे उद्यापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल.

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भाजपकडून जगताप कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार आहे. पण, जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप कि बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही.

महाविकास आघाडी एकच उमेदवार देणार की स्वतंत्र लढणार याबाबत उद्याप निर्णय झालेला नाही. उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत असून प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्तात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले कामकाज पाहत आहेत. चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना थेरगावातील महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या तिस-या मजल्यावर अर्ज सादर करता येणार आहेत.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल