शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना आक्रमकतेचे बाळकडू पाजले – नंदकुमार सातुर्डेकर

0
157

भोसरी, दि.३० (पीसीबी) :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना आक्रमकतेचे बाळकडू पाजले असे मत ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी सातुर्डेकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन सानप, महिला आघाडी शहर उप संघटिका आशा भालेकर, भोसरी विधानसभा शिवसेना समन्वयक अंकुश जगदाळे ,विभाग प्रमुख तुकाराम वारंग, सतीश मरळ, नितीन बोन्डे उपस्थित होते.

सातुर्डेकर म्हणाले की, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने राज्यात मुख्यमंत्रीपद व केंद्रात मंत्री पदापर्यंत मजल मारली. ती केवळ शिवसेना प्रमुखांच्या खंबीर नेतृत्वामुळेच. शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना नगरसेवक ,आमदार, मंत्री ,मुख्यमंत्री केले, मात्र त्यांना पदाचा मोह कधी झाला नाही. त्यामुळेच त्यांनी अखंड हिंदुस्तान मधील जनतेच्या हृदय सिंहासनावर राज्य केले. आज त्यांच्या नावे राजकारण करणाऱ्या कोणालाच खरे बाळासाहेब समजले नसल्याची खंत सातुर्डेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी मानव कांबळे म्हणाले की, या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुलेही सहभागी झाली अशा स्पर्धांमधूनच सर्जनशील, संवेदनशील समाज निर्माण होऊ शकेल.

विनिता ऐनापुरे म्हणाल्या की, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे अक्षर ,शुद्धलेखन ,विचार प्रदर्शन याचा कुठेही पायपोस राहिलेला नाही. म्हणून निबंध स्पर्धां सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील.

या स्पर्धेत प्रमोद येवलेकर व बबन चव्हाण यांनी प्रथम क्रमांक विभागून पटकावला. द्वितीय क्रमांक वैष्णवी आटोळे व हरिश्चंद्र भोसले यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक विजय सावंत व शिवराम गवस यांना विभागून तर चतुर्थ क्रमांक सरिता दोरगे व रेखा कर्डिले यांना विभागून देण्यात आला. अर्पिता कसबे यांनी पाचवा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत सचिन घाटकर ,मंगला पाटसकर व साक्षी यंदे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे , युवा सेना भोसरी शहर प्रमुख अजिंक्य उबाळे, विधानसभा प्रमुख अमित शिंदे यांनी केले. राजेंद्र घोडके यांनी आभार मानले.