चाकणमध्ये मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; सात जणांना अटक

0
2110

चाकण, दि. १९ (पीसीबी) – मुलींची छेडछाड केल्याच्या संशयावरून सात जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला फावड्याच्या दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. या तरुणाचा रविवार (दि.१८) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आकाश बाबुराव शेलार (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. अमित उर्फ आण्णा बजरंग माने, पद्माकर चितलेवाड, संदीप किसन कुसाळकर, गणपत लोहार, आकाश दौंडकर, सागर विटकर, सोन्या तामळगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याविरुध्द मारहाण करुन खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास बालाजीनगर स्टॉप जवळील साई पान शॉपच्या पाठीमागे असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आरोपींनी हातातील फावड्याच्या दांडक्याने आकाशला डोक्यात, हातावर, पायावर व पाठीत जबर मारहाण करून जखमी केले होते. त्यानंतर स्थानिकांनी आकाशला उपचारासाठी प्रथम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला नंतर मॅक्स न्यूरो हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. मात्र आकाशचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.