रताळ्याला म्हणतयं केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळं; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

0
655

नांदेड, दि. १३ (पीसीबी) –  आज मनसेची अवस्था  ही उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना अशी झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे  दुसऱ्याच्या लग्नात नाचत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राज यांच्यावर  हल्ला चढवला .

नांदेडमधील भोकर येथे प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ  मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत  मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे  ते काहीही बोलत आहेत. त्यांना कुणाला काही पुरावाच द्यायचा नाही. राज ठाकरे यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मात्र, मला जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवले. तुम्हाला मात्र घरी बसवले. तुमचा सुपडा साफ केला, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, राज्यात पाणी टंचाई आहे. तर दुसरीकडे  महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत आहे आणि दुसऱ्या मार्गाने गोदावरीचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर केला होता.  तसेच  फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राज यांनी केली होती.